Thursday, July 23, 2009

Bayako | Wife | बायको

बायको...........

अशी आपली बायको असावी - हजार जणींत उठून दिसावी
थोडीसुद्धा तिला मात्र, त्याची मिजास नसावी

अशी आपली बायको - भक्कम पगाराची,कायम नोकरीची असावी
म्हणेन तेव्हा मात्र, ती मला घरीच दिसावी

आपली बायको - चतुर, शहाणी,अभिमानी असावी
माझ्यापुढे मात्र, मान तिची खाली असावी

अशी आपली बायको - सभेत धीट, कामाला वाघ असावी
माझ्या समोर घरीदारी मात्र, ती गरीब गाय असावी

अशी आपली बायको - बोले तैसी चालणारी असावी
माझ्या जुन्या वचनांची मात्र, तिला कधी आठवण नसावी

अशी आपली बायको - प्रसन्न, सदा हसतमुख असावी
माझ्या आक्रस्ताळीपणावर मात्र, तिच्या भाळी आठी नसावी

अशी आपली बायको - शांत गंभीर, पोक्त असावी
माझ्या बालिशपणाविषयी मात्र, तिची काही प्रतिक्रिया नसावी

अशी आपली बायको - व्यवहारी, काटकसरी असावी
माझ्या उधळपट्टीवर मात्र, तिची कधी टीका नसावी

अशी आपली बायको - एक आदर्श गृहिणी असावी
माझ्या ढिसाळपणाबद्दल मात्र, तिची काही तक्रार नसावी

अशी आपली बायको - सुसंस्कृत माता असावी
माझ्या बेबंद वागण्याची मात्र, मुलाबाळांवर सावली नसावी

अशी आपली बायको असावी - माझ्यापलिकडे तिची दृष्टी नसावी
मी खिडकीबाहेर बघण्याला मात्र, तिची कधी हरकत नसावी !

No comments:

Post a Comment