मी माझा,
चंद्रशेखर गोखले
पुतळे उभारून
खरच स्फूर्ती मिळते का?
ते सरावाचे झाल्यावर
नजर तरी वळते का?
चढाओढ या शब्दाचा अर्थ
आपण किती उलटा लावतो
कोणी वर चढताना दिसला
की लगेच खाली ओढायला धावतो
इथे प्रत्येकाला वाटते
आपण किती शहाणे
यावर उपाय एकच
सगळं शांतपणे पाहणे
नुसतच बरोबर चाललं तर
सोबत होत नाही .
आणि कर्तव्य म्हणून केलं तर
ती मदत होत नाही
तुझ्यावर रागावणं हा
तुला आठवण्याचा बहाणा आहे.
तु आलास की तो जातो
तसा माझा राग शहाणा आहे.
नेहमीच डोक्याने विचार करू नये
कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना
स्वप्नांचा गाव द्यावा
तू अन् मी भेटायचो ते
वडाचं झाड माझ्यासारखंच
कमरेत वाकलयं तिथचं माझ्या
मुलानं चहाचं दुकान टाकलयं
देवळात गेली की माणसं
दुकानात गेल्यासारखी वागतात
चार-आठाणे टाकून
काही ना काही मागतात
No comments:
Post a Comment